Liver Transplant By Dr. Ninad Subhash Deshmukh

Over 10 years we help companies reach their financial and branding goals. Engitech is a values-driven technology agency dedicated.

Gallery

Contacts

411 University St, Seattle, USA

engitech@oceanthemes.net

+1 -800-456-478-23

Liver Care

Liver Transplant By Dr. Ninad Subhash Deshmukh

चांदोबाचे ट्रान्सप्लांट*.
(सत्यघटना क्र. २ )
लेखन:क्षितिजा आगाशे
वाचकहो जिवंतपणी सुरक्षित यकृत दान या विषयावरील पालवी या माझ्या कथेचं आपण भरभरून स्वागत केलत.त्याच पार्श्वभूमीवर ही दुसरी सत्यकथा आपल्यासाठी !

ही कथा १००%सत्य असून त्यात उल्लेख केलेली सर्व माहिती आणि डॉक्टरांचे तपशील तसेच सर्व माहिती शास्त्रीय असून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली ‘जिवंतपणी यकृत दान’ या संकल्पनेच्या जनहितार्थ प्रसार करण्याच्या हेतूनं लिहिली आहे*
अधिक माहितीसाठी संपर्क ..*डॉ.निनाद देशमुख.(लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन)
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल* पुणे.
Mob: 9158883611
Mail: drninaddeshmukh@yahoo.com
https://organtransplantpune.com
चांदोबाचे ट्रान्सप्लांट
* लेखन:क्षितिजा आगाशे*

किती तरी दिवसांच्या अथक मेहनती नंतर आज डॉ.देशमुखांच्या चेहऱ्यावर एका आगळ्या वेगळ्या समाधानाचं तृप्त चांदणं पसरलं होत.एरवी दिवसा अखेरी कामाच्या भारामुळे जाणवणारा थकवा आज त्यांना मुळीच जाणवत नव्हता.आणि त्याला कारणही अगदी तसच होत.
डॉक्टरांच्या मनाच्या कॅनव्हासवर दोनमहिन्यापूर्वीच ते सगळं चित्र लख्ख उभ राहील.
अगदी व्याकुळ भाव डोळ्यात घेऊन भिवा आणि त्याची बायको चंद्रिका कडेवर आपल्या लेकराला घट्ट धरून डॉक्टरांच्या समोर बसले होते.
भिगवण जवळच्या अगदी चिमुकल्या खेड्यातून मोठी शिकस्त करत खांद्यावर एका मुलाला घेऊन ते जोडपं डॉक्टरांचा शोध घेत त्यांच्या पर्यंत पोचल होत. अगदी घामाघूम,चेहऱ्यावर प्रचंड ताण,मनात भीती आणि उरात धडधड ..हे सगळं त्यांना समोर पाहताच डॉक्टरांना जाणवत होत.
उन्हात काम करून रापलेला देह ,अपार काबाडकष्ट करून काटक झालेली शरीरयष्टी आणि अंगावरचे जीर्ण कपडे; हे अगदी स्पष्ट होत की ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत.”बोला काय होतंय ?”डॉक्टरांनी आस्थेने विचारले. त्यावर भिवा काकुळतीला येऊन विनवत बोलला ,”डागतर,काय भी करा पर माज्या भूषन ला बर करा.पाठोपाठ त्याची पत्नी चंद्रिका ही त्वरेने म्हणाली ,”दागतर आमचा भूषन आता हाये दोन वर्सांचा.अन् एक दिवस इपरितच झालं!अव पोरच ते चालता चालता पडलं अन् येकदम मांडीच हाडच मोडल बगा.महिना झाला पर जुळून येईना झालंय.लै डागतर झाले, पेशलिस्ट जाले पर पोर काय सरळ चालेना; पाय खुरडत खुरडत कस बस फूड जायला बघतो. पन त्ये भी जमत न्हाई.खरोखरच भूषण चा डावा पाय पूर्ण अधू झाला होता..एव्हढच नव्हे त्याची शारीरिक वाढही खुंटलेली दिसत होती , डॉक्टरांच्या अनुभवी नजरेस रिकिटस् (मुडदुस) ची लक्षण स्पष्ट लक्षात आली.शिवाय कावीळ ही झाली होतीच.आणि डॉक्टरांचा अंदाज पुढील चाचण्यांच्या मध्ये खरा ठरला.त्याच यकृत म्हणजे लिव्हर जन्मतःच अकार्यक्षम होत. त्याचाच सगळा परिणाम म्हणून ही अस्थिभंग होण्याची परिस्थिती आली होती.आणि यकृताची क्षमता नसल्याने लहान वयात सहज जुळून येणारे हाड अजूनही जुळून आले नव्हते
डॉक्टरांनी अतिशय सोप्या शब्दात त्या जोडप्याला खरी परिस्थिती समजावून सांगायला सुरुवात केली. ,”भिवा भाऊ ऐका, तुम्ही शेतात कस सगळीकडे पाणी देण्यासाठी पंप वापरता ना तसच आपलं लिव्हर सगळ्या शरीराला अन्नातून मिळणारी ताकद पोचवत.पण आपल्या भूषण च लिव्हर जन्मतःच निकामी आहे. त्यामुळे त्याची वाढ थांबली आहे आणि हाड पण मजबूत झाली नाहीयेत.लहान वयात सगळ्या जखमा तुटलेली हाड लगेच जुळून येतात पण ह्याच्या बाबतीत तस घडलेलं दिसत नाहीये.त्याला म्हणतात ‘टायरोसिनेमिया
(‘tayrosinemia) ‘
त्ये काय बी असू दे डागतर माज पोरगं नीट करा म्हन्जे देवच पावलं तुम्हाला!भूषणची आई कळवळून म्हणाली. तुम्हास्नी सांगते डागतर साहेब ,ह्यो माज्या पोटात व्हता ना तवाधरन म्या काय काय सपान पायल व्हतं.त्याला लै मोठ्ठा साहेब करनार व्हते.आमच्या गावच्या कलेक्टर वानी..लै जपलाय त्याला..त्यो पोटात असल्यापासून रोज त्याच्यासंग गोष्टी करायचो दोग बी..आम्हाला ना त्यो आकाशातला चंद्र लै म्हंजे लै च आवडतो.अक्षी न चुगता त्याला रोज त्यो चंद्र दाखवायचो ,त्याचा पप्पा म्हणे ,” तू बग, माज पोरगं बी अस्स त्या
चंद्रावानी रोज मोठा मोठ्ठा होईल,अगदी घराण्याचं भूषन होईल. मग मी त्याच्याकडं मान वर करून पाहणार.त्याला लै शिकवायच आणि लै लाड करायचे. आमी ना त्येला चांदोबा च म्हणतो जल्मापासन! पनं माज्या चांदोबा च हे काय होऊन बसलय बघा ना”!
मग मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला. पन ह्ये भलतच होतंय की; अवो माज पोरगं पूर्णिमेपासून आवसेच्या चंद्रागत सुकून सुकून चाललंय. आतापोतर दागतर सांगेल त्या समद्या टेस्ट केल्या पर काय भी उपेग नाही कशाचा.तुमचं नाव लै ऐकलंय. माझ्या पोराला वाचवा डागतर.
दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून कसबस हाता तोंडाशी गाठ पडणाऱ्या जोडप्याच ते बोलणं ऐकून डॉक्टर सुद्धा हेलावले.
पोटचा पोरगा जगावा म्हणून उधार उसनवार करत सोलापूर ला नकार ऐकून ते पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोचले होते.
आणि त्यांच्या काळजाच्या तुकड्याच्या आयुष्यासाठी गयावया करत होते.हात पसरत होते.
जन्मताच अकार्यक्षम असलेल्या यकृताला बदलून तेथे नवीन यकृताचे प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा इलाज नाही हे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं.आणि कोणतीही जिवंत आणि निरोगी व्यक्ती हे यकृतदान करू शकते अगदी बिनधोकपणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांना सविस्तर समजावली.
“माज काळीज बी घ्या पर त्येला वाचवा.”.दोघंही एकाच वेळी बोलली.”न्हाई पोराला माय पायजे त्येची , तुमी माजच यकृत द्या, डागतर साहेब” भिवा हात जोडत म्हणाला, त्यावर चंद्रिका लगेचच उत्तरली ,”न्हाई न्हाई बापाशिवाय पोरगं उघड्यावर येईल .माझ्या माघारी त्याचे पप्पा कसबी मोट्ट करतील त्याला..तुम्ही माजच यकृत द्यावा डागतर!” चांद्रिकेन जणू निर्णयच दिला …अगदी निश्चयान. दोघेही पोटच्या पोराला वाचवण्यासाठी स्वतःच आयुष्य हसत हसत द्यायला तयार होते.नव्हे त्यावरून त्यांच्यात चढाओढ सुरू झाली होती.
अहो भिवा दादा काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला दिसतोय तुमचा! डॉक्टर हसून म्हणाले.
अहो तुमचं अख्खं लिव्हर द्यायची गरजच नसते. त्याला त्याच्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचा असेल तेवढाच लिव्हर चा भाग घ्यायचा. आणि लिव्हरची खासियत असते ते जरी थोडंसं कापून दान केलं ना तरीसुद्धा दोन अडीच महिन्यात ते परत पहिल्यासारख वाढतं आणि अगदी पहिल्यासारखा नॉर्मल होतं. आणि ज्याला आपण लिव्हर चा छोटा भाग देतो त्याच सुद्धा लिव्हर परत पूर्ण वाढत. आल का लक्षात.. आणि मग तुमच्या लाडक्या चांदोबाला
तुम्ही आई आणि बाबा दोघांनी मिळून वाढवायचं आहे.कोणालाही काहीही अपाय होणार नाही याची जबाबदारी माझी.
सुदैवाने लगेचच चांद्रिकेचा रक्तगट जुळला.आणि शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित झालं.आपल्या मुलाला आपला यकृताचा तुकडा देऊन त्याचा जणू पुनर्जन्म अनुभवणार आहोत या नुसत्या कल्पनेन चंद्रिका मनोमन शहारली होती.तिला तिच्या चांदोबाला घेऊन खूप खूप खेळवायच होत.त्याच्या बरोबर डोंगर चढायचा होता,त्याला नदीवर पोहायला घेऊन जायचं होत,त्याच्या सगळ्या चंद्रकळा पहायच्या होत्या.
सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग कस आणायचं.ही सर्वात मोठी समस्या होती त्यांच्यापुढे.होते नव्हतं ते सगळं उपचाराच्या खर्चासाठी आतापर्यंत पूर्णपणे संपलं होतं.पण त्यांची देवावरची श्रद्धा अढळ होती.
आणि काहीही झालं तरी पोराला वाचवायचंच ही जिद्द त्यांच्या मनात पक्की होती. “डागतर आम्ही आमच्या काळुबाईला साकडे घातलय काहीतरी मार्ग निघेल.तुम्ही पण काहीतरी सुचवा डागतर ;काय करू ? कस करावं ? कोणाला भेटू? सरकार काही मदत करल का?
कायपन करा. लागलं तर आमी दोग बी जलमभर त्यांची चाकरी करू . पन आमचा चांदोबा आम्हाला बरा करून द्या हो ”
त्यांची जिद्द आणि पाठपुरावा पाहून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं हे डॉक्टर आणि दीनानाथ मंगेशकर टीम न केव्हाच पक्क केलं होतं. डॉक्टरांच्या स्वभावातली ऋजुता आणि त्यांची पेशंट बद्दलची तळमळ सगळ्यांनाच माहिती होती. डॉक्टरांचे जवळचे सहकारी प्रशांत कुलकर्णी आणि त्यांची टीम पूर्ण ताकदीनिशी कामाला लागली. समोर येणाऱ्या प्रत्येक संवेदनशील दात्याला पत्र पाठवण्यात आली,वर्तमानपत्रात निवेदन देऊन मदतीचं आव्हान केलं गेलं.जमेल तिथे तिथे भेटणे,जाणे संस्था,धर्मादाय ट्रस्ट,वैयक्तिक देणगीदार जाऊन ,लिहून, बोलून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व प्रकारे प्रयत्न सुरू झाले. भेटीगाठी सुरू झाल्या. कोणी ५००/१००० हजार पासून अगदी लाखापर्यंत बघताबघता देणगी जमा झाली आणि थोडीथोडकी नव्हे तर 16 लाख रुपयांची रक्कम दिनानाथ मंगेशकर टीम ने अथक परिश्रम करून स्वतः उभी केली.
चंद्रिका च्या मनात विचारांचं थैमान चालू होत. ” आता माझ्याकडे कोणी सहानुभूतीच्या नजरेने बघणार नाही! माझ्या चांदोबाला आता कोणीअपंग म्हणून रागाने दूर लोटणार नाही! भिवाला कोणत्या जन्मीचं पाप माती आलं ,म्हणून कोणी टोचून बोलणार नाही! माझ्या गोंडस चांदोबा ची सावली सुद्धा अभद्र आहे असं मानून शेजारपाजारच्या आयाबाया आपल्या छोट्या लेकरांना घेऊन माझ्यापासून दूर दूर राहणार नाहीत. माझा चांदोबा आता तिथी प्रमाणे खरंच वाढत वाढत जाईल अगदी प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत.
तो चारचौघां सारखा चालेल,धावेल दुडूदुडू पळेल आणि मी त्याच्या मागे मागे.चांद्रिकेच स्वप्नरंजन सतत चालू होत.
अखेर शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला.”माझ्या चांदोबाला कडेवर घ्यायला माझा श्वास चालू असेल ना,मलाच काही झालं तर?”,पण तिन निश्चयान ते सारे विचार बाजूला सारले.आणि तिची आणि चांदोबाची शस्त्रक्रिया सुरू झाली. चंद्रिके च्या लिव्हरचा फक्त वीस टक्के भाग देऊन चांदोबा ची लिव्हर ट्रान्सप्लांट ॲक्शन
अपेक्षा पेक्षा सुद्धा उत्तम रित्या पार पडली.
अगदी खुरडत खुरडत चालणाऱ्या, अशक्त असणाऱ्या , कोमेजून गेलेल्या चांदोबाची तब्येत सुरवंटाचे फुलपाखरू व्हावं तशी भराभर भराभर सुधारू लागली.त्याच वजन वाढलं,त्याच्या नवीन यकृताची कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारली.
प्रत्येक तपासणीच्या वेळेला चंद्रिकेचा चेहरा अत्यंत खुललेला दिसू लागला.ती आवर्जून सांगायची, ” डागतर,आजूबाजूच्या आया बाया आता येऊन येऊन आमच्या चांदोबाला पाहतात आनि म्हनतात,” पुण्याच्या डागतर नी तर पार जादूच केली म्हनायची”. हे सारं ऐकताना चंद्रिका अन् भिवाच्या चेहऱ्यावर तो ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान पाहून डॉक्टरांना आणि टीमला आपल्या परिश्रमाचं खरोखरच चीज झाले असं वाटलं.
आणि आज तर नुकताच गावच्या शाळा मास्तरांच्या मोबाईल वरून भिवाने चांदोबा चा व्हिडिओ पाठवला होता.
आधी नुसतं सरळ उभ पण राहता येत नसणारा चांदोबा आता स्वतःचा स्वतः उभ राहून दुडूदूडू पळायला लागला होता.
डॉक्टरांची नजर खिडकीतून आकाशाकडे गेली ..स्वतंत्र आणि स्वच्छ आकाशात कोजागिरीचा
पौर्णिेमेचा संपूर्ण चंद्र आज अगदी तेजाने चमकत होता.आणि त्याच तृप्त चांदणं डॉक्टरांच्या चेहऱ्यावर पसरलं होत .

आपले परिचित स्नेही नातलग आणि डॉक्टर अगदी प्रत्येकापर्यंत ही गोष्ट आवर्जून पोचवा.आणि ह्या चळवळीचा एक महत्त्वपूर्ण योगदान द्या. 👍

Author

Dr. Ninad Deshmukh